उपाध्याय विरंजनसागरजी महाराज यांच्या सानिध्यात देशमुखनगर जैन मंदिरात पर्युषण पर्व निमित्त १० दिवसांचे भव्य कार्यक्रम आयोजित

0
3
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – श्री १००८ मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर, देशमुखनगर येथे प.पू. आचार्य समाधी सम्राट विरागसागरजी महाराजांचे प्रभावक शिष्य, प.पू. पट्टाचार्य विशुद्धसागरजी महाराजांचे आज्ञानुवर्ती शिष्य प.पू. उपाध्याय १०८ विरंजनसागरजी महाराज, मुनिश्री विनीशोधसागरजी महाराज, मुनिश्री विसौम्यसागरजी महाराज तसेच शुल्लिका विशिलाश्री माताजी ससंघ यांचा चातुर्मास सुरू आहे. हा संघ जबलपूर येथून देशमुखनगर येथे आला असून महाराजांच्या सानिध्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. जैन धर्मीयांचे महापर्व पर्युषण २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी १० दिवसांचे भव्य कार्यक्रम आखण्यात आले असून याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कार्यक्रमाचा प्रारंभ २६ ऑगस्टला रोठतीज आणि घटयात्रेने होईल. सकाळी ७ वाजता समाजबंधूंच्या उपस्थितीत बॅंड पथकासह भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. यावेळी सौधर्म इंद्र-इंद्राणी यांची निवड देखील करण्यात येईल.
दैनिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील:
सकाळी ५:४५ – ध्यान शिबीर
सकाळी ७:०० – भगवानाचा पंचामृत अभिषेक
सकाळी ८:०० – सामूहिक पूजन
सकाळी ९:३० – महाराजांचे विशेष प्रवचन
दुपारी २:३० – तत्वार्थ सूत्र मंडळ विधान
संध्याकाळी ६:०० – प्रतिक्रमण
संध्याकाळी ६:३० – भक्ती संध्या
संध्याकाळी ७:१५ – आरती
रात्री ८:०० – पंडित मुकेश भैया (टीकमगड) यांचे प्रवचन
रात्री ८:३० – सांस्कृतिक कार्यक्रम
तसेच उपाध्याय विरंजनसागरजी महाराज यांच्या सानिध्यात दररोज दशलक्षण धर्मांवर विशेष प्रवचन होणार आहे.
उपाध्याय विरंजनसागरजी महाराज यांनी पर्युषण पर्वाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, जैन धर्मात पर्युषण पर्वाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे कारण हे आत्मशुद्धीचे पर्व आहे. या १० दिवसांत सर्व जैन धर्मीय धार्मिक साधना, पूजन व व्रतांचे पालन करतात. याला दशलक्षण पर्व असेही म्हटले जाते. जीवनभर या व्रतांचे पालन करण्यासाठी त्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
हे दशलक्षण धर्म म्हणजे – उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, सत्य, संयम, शौच, त्याग, आकिंचन्य, ब्रह्मचर्य आणि तप. यामध्ये सर्वात पहिला उत्तम क्षमा म्हणजे प्रत्येकाने आपल्या स्वभावात क्षमाशीलता आणली पाहिजे. आपल्या जीवनात क्षमाधारणेला फार मोठे स्थान आहे. क्षमेपेक्षा मोठे धार्मिक आचरण दुसरे कोणतेही नाही. म्हणून पर्युषण पर्व हे आत्मशुद्धीचे सर्वोच्च पवित्र पर्व आहे.
या प्रसंगी समाजबंधूंना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्युषण महापर्व व छत्रपती संभाजीनगर येथे प्रथमच आयोजित होणाऱ्या तत्वार्थ सूत्र मंडळ विधानाचा लाभ घ्यावा. यासाठी हजारांहून अधिक श्रद्धाळूंसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्व कार्यक्रम भगवान मल्लीनाथ देशना मंडळ, देशमुखनगर, शिवाजीनगर येथे पार पडणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here